आता आपण कुणाच्या नि कश्याच्याच आकंठ-वेडसर प्रेमात पडणं शक्य नाही असं एका टप्प्यावर लक्षात येतं आणि आपण निबर-शहाणपणाकडे काहीशा कष्टानंच पाऊल टाकणार असतो, त्या टप्प्यावर मला शेरलॉक भेटला. प्रश्न आणि उत्तरांची सरमिसळ होते त्या करड्या प्रदेशाच्या सीमेवरतीच तो थांबलेला. समोरच्या वैराण आकर्षक प्रदेशाची कमालीची ओढ वाटत असते, पण पुढे जायचं धैर्य होत नाही. अशात एकदाच कळून जातं, की मागचे बंध कमालीचे चिवट आहेत आणि या आयुष्यात तरी ते आपल्याकडून तुटता तुटायचे नाहीत. मग ते शहाण्या मुलासारखं स्वीकारून तो तिथेच थांबलेला. चिरंजीव होऊन. तळ्या-मळ्याच्या निर्जन काठावर त्याची सोबत झाली नसती, तरच नवल.

Tuesday, June 5, 2012

दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन: ३



आधीची प्रकरणे:

प्रकरण ३: ६ सप्टेंबर

दी ब्लॉग ऑफ युजिनिया व्ही. वॉटसन, लायसन्स टू किल

६ सप्टेंबर

ओके. मी बरेच दिवस याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतेय नि मला जमत नाहीये.

निकोटीन पॅचेस.

आई म्हणाली तिनं शेरलॉकला तीन निकोटीन पॅचेस् लावलेले असताना पकडलं. कधी ते मला माहीत नाही. पण कधीही असलं, तरी त्यानं काय फरक पडतो? त्याचं काही समर्थन असूच शकत नाही. शेरलॉकनं एका वेळी एकाहून जास्त पॅचेस् लावताच कामा नयेत. कुठल्याही परिस्थितीत. फक्त बाबाला (नि मला) त्यानं तसं प्रॉमिस केलंय म्हणून नाही, तर त्याला काहीही होऊ शकतं, त्याच्या जिवावर बेतू शकतं, म्हणून. नि शेरलॉकला काही झालं तर... बाप रे, मला कल्पनेनंच कसंतरी होतंय.

मला लिहितानाही हा विचार करवत नाहीय. पण केला पाहिजे. जसा जमेल तसा, जमेल तितका. लिहून बरं वाटतं म्हणतात. कदाचित मला बरं वाटेलही. अर्थात, बरं-बिरं वाटायसाठी नाही लिहीत मी! पण मन मोकळं करून शांत वाटतं हेही खरं आहेच, ना?

ओके. मी प्रयत्न करते. माझ्या फॅशनेबल शाळेतल्या इंग्लिश कॉम्प वर्गांना पालक इतके पैसे भरतात ना? त्याचा कितपत फायदा होतो बघू.

काही वर्षांपूर्वी शेरलॉक एका महत्त्वाच्या केसवर काम करत होता. तीन दिवस तो झोपलाच नव्हता. त्यात त्यानं तेव्हा नुकत्याच शोधून काढलेल्या त्या कॅफीनच्या गोळ्या. किती घेतल्या होत्या देव जाणे. आणि वरून निकोटीन पॅचेस्. एक नाही, दोन नाही. सात. सा-त.

बाबा मला बुद्धिबळाच्या कोचकडून आणायला आला होता. मला घरात सोडून तो स्वैपाकघरात काहीतरी खायला म्हणून गेला नि शेरलॉकच्या केसचं कुठवर आलंय ते बघायला मी '२२१'मधे शिरले.

तो व्हरांड्यात बेशुद्ध होऊन पडलेला. बधिर होऊन मी सेकंदभर नुसती बघतच राहिले. तेव्हाचं ते हतबल वाटणं मला कधीही विसरता येणार नाही. कधीतरी माझ्या तोंडून आवाज फुटला नि ओरडून मी बाबाला हाक मारली. माझ्या आवाजातली आणीबाणी त्याला तेव्हा जाणवली असणार. कारण तो अक्षरश: धा-व-त आल्याचं मला आठवतंय. शेरलॉकला असं पडलेलं बघून त्यानं आधी मला बाजूला केलं नि काय झालंय ते पाहिलं.

"जिनी, अ‍ॅम्ब्युलन्स बोलाव." तो म्हणाला. आवाज ठाम, शांत आणि परिस्थितीवर पूर्ण ताबा असलेला. बाबाचा 'डॉक्टर' आवाज.

"बाबा, काय झालंय त्याला? तो-" काही कळायच्या आत माझ्या तोंडून निघून गेलं.

तोवर बाबानं शेरलॉकला कुशीवर वळवलं होतं नि तो त्याची नाडी बघत होता. "नाही, जिवंत आहे तो. जा, फोन कर ताबडतोब!" तो माझ्यावर ओरडला. मग एकीकडे त्याला हाका मारत, त्याला जागं करायचा प्रयत्न करत बाबानं शेरलॉकची बुबुळं तपासली. तेव्हाच कधीतरी मी अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला असणार. मला आता नीटसं आठवत नाही.

शेरलॉक शुद्धीवर आला खरा, पण त्याला कशाचंही भान नव्हतं. तो थरथरत होता, आचके देत होता. "शेरलॉक, तुला काहीही होणार नाहीये. फक्त श्वास घे," बाबा त्याला सांगत होता. एकीकडे त्यानं शेरलॉकला घट्ट धरून ठेवलं होतं. इतक्यात अ‍ॅम्ब्युलन्स आली नि त्यांनी शेरलॉकला मागे ठेवलं. कॅफीनच्या गोळ्या नि निकोटीन पॅचेस् बद्दल बाबा त्यांना सांगत असताना, थरथर कापत, हाताच्या मुठी घट्ट वळून तिथे उभी राहिल्याचं मला आठवतं. मला करण्यासारखं काही नव्हतंच. 'तुम्ही येताय का' असं अ‍ॅम्ब्युलन्सवाल्यांनी बाबाला विचारल्यावर त्यानं माझ्याकडे पाहिलं. माझ्या ताबडतोब लक्षात आलं, की काहीही करून त्याला शेरलॉकसोबत असायचंय. पण मला एकटीला सोडून जायला त्याचा जीव होत नव्हता. त्या परिस्थितीत एकटीनं तिथं थांबायची माझीही तयारी नव्हती. पण शेरलॉकलाही एकट्यानं जाऊ द्यायचं नव्हतं.

"तुम्ही येताय की नाही?" त्यांनी परत विचारलं.

"नाही, माझ्या लेकीला एकटीला नाही ठेवता येणार. आम्ही मागून टॅक्सीतून येतो." बाबाचा चेहरा दगडी झालेला.

ते लोक निघाले. मी बाबाजवळ गेले. त्यानं मला इतकं घट्ट जवळ घेतलं, की त्याचा आवळलेला दगडी चेहरा नि धपापणारा श्वास माझ्यापासून लपलाच नाही. तो मनातून केव्हाच शेरलॉकजवळ पोचला होता. "बाबा, तू जायला हवंस त्याच्याबरोबर." मी त्याला म्हटलं.

"नाही गं, जिनी, आपण जाऊ ना मागोमाग."

"माझी मी टॅक्सीतून येईन ना बाबा. त्याला जाग आली नि तू जवळ नसलास तर?"

इतक्यात कुठूनशी आई अवतीर्ण झाली. घराबाहेर अ‍ॅम्ब्युलन्स बघून ती चरकली असणार. पण अशा वेळी घाबरून जाईल, तर ती माझी आई कसली? पळतच '२२१ बी'मधे जाऊन तिनं काय काय गोळा करून आणलं, मला बाबापासून दूर केलं नि त्याला ढकललं. "जा, पळ."

"ग्रेस, मी..."

"जा, जॉन. तुझ्या नवर्‍यासोबत असायला हवंस तू आत्ता. जा, पळ. अजून असेल अ‍ॅम्ब्युलन्स इथेच." मला घट्ट धरून ठेवत तिनं त्याला सांगितलं.

बाबानं तिच्याकडे बघितलं, मग माझ्याकडे बघितलं. माझ्या कपाळावर ओठ टेकत, तिच्या गालाला हात लावला त्यानं. नि मग धावत गेलासुद्धा. मग मात्र मला जे रडू कोसळलंय, ते थांबता थांबेचना. "सगळं नीट होईल. काही नाही व्हायचं त्याला," असं काहीतरी समजावत, जवळ घेऊन आईनं मला शांत केलं. मी जरा शांत झाल्यावर लगेच टॅक्सीतून आम्ही हॉस्पिटल गाठलं.

शेरलॉकला बघायला आम्हांला त्यांनी आत जाऊ दिलं, तेव्हा त्याला जाग आलेली होती. आम्हांला बघून तो हसला. पण बाबा भडकलेलाच होता. त्याला इतकं भडकलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. मला समजू शकतं म्हणा. शेरलॉकला असं बघून त्याचा उडालेला थरकाप, मग शेरलॉकला काहीही होणार नाहीये, हे डॉक्टरांच्या तोंडून ऐकेपर्यंत बाहेर ताटकळत काढलेले लांबलचक - न संपणारे तास... सगळंच. शेरलॉक नसलाच - तर काय, असा विचार करत बाहेर उभं राहिल्याचं मला आठवतं. शेरलॉकशिवाय माझं काय होईल हा विचार मला करवेचना. मग मी बाबाचा विचार करत बसले. शेरलॉक नसला, तर बाबाचं काय होईल? बाबा परत कधीच पहिल्यासारखा व्हायचा नाही. मी त्या दोघांची यथेच्छ चेष्टा करत असले, तरी ते काही खरं नव्हे. त्यांच्याइतकं नि त्यांच्यासारखं एकमेकांच्या प्रेमात असणं म्हणजे काय याची नुसती कल्पना जरी मला कधी करता आली, तरी मी स्वतःला धन्य समजीन. नि एका फडतूस नशेच्या मोहापायी शेरलॉकनं ते सगळं उधळून दिलेलं. बाबा भडकेल नाही तर काय? शेरलॉकला काहीही होऊ शकलं असतं या कल्पनेनं मलाही राग अनावर झाला.

पण माझा राग टिकला नाही. त्याला जाग आलेली बघितल्यावर एकदम हायसं - हलकं हलकं वाटलं. धावत त्याच्याजवळ जाऊन मी त्याला मिठी मारली. तो आडवा असल्यानं ते जमलं नाही, पण तरी मी त्याच्या गळ्यात पडलेच. त्यानं माझ्या पाठीवर हात टाकत मला जवळ ओढलं. "हो-हो, शांत हो क्रम्पेट," तो म्हणाला. सर्वसाधारण आई-बाबा 'सोन्या', 'राजा', 'पिल्ल्या' असं काहीबाही मुलांना म्हणतात. शेरलॉकनं मला कधीच अशा नावांनी हाक मारलेली नाही. तो नेहमीच मला माझ्या नावानं हाक मारतो. पण अगदी क्वचित, सठीसहामाशी कधीतरी मला 'क्रम्पेट' म्हणून हाक मारतो. का कुणास ठाऊक.

"बरी आहे मी." त्याच्या हॉस्पिटल गाउनमधे मान खुपसत मी म्हटलं. "तू बरा आहेस, मग मीपण बरी आहे." मी वर बघितलं, पण तो माझ्याकडे बघत नव्हता. तो बाबाकडे बघत होता.

"जॉन," बाबाकडे बघत त्यानं आपला हात थोडा उचलला. बाबाच्या हातात देण्यासाठी जणू.

"किती वेळा, शेरलॉक?" बाबा कमालीचा संतापलेला असतो, तेव्हाच मी बाबाचा असा, इतका खालच्या सुरातला आवाज ऐकलाय. "किती वेळा सांगितलंय तुला, किती वेळा 'विनवलंय'? असा बेदरकारपणे नको वागत जाऊस. पण तुला कामापुढे कधी काही दिसलंय? दुसर्‍या 'कुणाची' कधी पर्वा केली आहेस तू? कधीच नाही. मग मागे कुणाचंही काहीही होवो."

मी शेरलॉकच्या गळ्यातून हात काढत सरळ झाले, पण त्याच्या जवळून हलले नाही. त्याचा हात सोडला नाही. अर्थात मी मधेही पडणार नव्हतेच. त्याला असंच पाहिजे. "आयॅम - सॉरी," तो पुटपुटला.

"सॉरी? सॉरी म्हटलं म्हणजे झालं?" बाबा अजूनच संतापला. माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला, "जिनीला सापडलास तू. 'बेशुद्धावस्थेत पडलेला'. तिला वाटलं की तू जिवंत नाहीयेस! 'तुझ्या'मुळे शेरलॉक, तुझ्यामुळे. तिच्या डोक्यातून हे कधीही पुसलं जाणार नाही. तुझ्या या असल्या निष्काळजी वागण्यामुळे. कारण? फक्त तुझा हट्टीपणा. तुला कायम तुझंच खरं करायचं असतं!" शेरलॉकनं पुढे होऊन बाबाचा हात धरला. बाबा हताश होऊन बोलायचा थांबला. शेजारच्या खुर्चीत बसला. मागे बघितलं तर माझ्या खांद्यावर हात ठेवून आई उभी होती. शेरलॉकचा हात सोडून मी थोडी मागे झाले. आईवर रेलले. ती होती म्हणून किती बरं! बाबा नुसता जमिनीकडे नजर खिळवून बसला होता. म्हणाला, "तुला समजत नाही का? याचा त्रास फक्त तुला एकट्याला नाही होत. मला होतो, जिनीला होता. ग्रेसला होतो. तू आता पहिल्यासारखा स्वत:चा जीव धोक्यात घालायला मोकळा नाहीस. पहिल्यासारखा तरुणपण नाहीयेस तू आता, आपण कुणीच नाहीयोत." उठून जवळ जाऊन त्यानं शेरलॉकचा हात हातात घेतला नि त्याच्या नजरेत नजर रोखून एकटक बघत राहिला. "माझ्याकडे बघ नि मला वचन दे, परत असं कधीच करणार नाहीस. परत इतके पॅचेस् लावणार नाहीस नि त्या कॅफीनसारखं काही खाणारही नाहीस. निदान मला सांगितल्याशिवाय तरी नाहीच नाही. शेरलॉक, असा नको रे वागूस माझ्याशी. मी कसा जाऊ देऊ तुला, मी..." बाबाला पुढे बोलता येईना. मलापण घशात काहीतरी टोचल्यासारखं वाटायला लागलं.

किती तरी वेळ शेरलॉक बाबाकडे एकटक बघत राहिला. बाबाच्या शब्दांच्याही पकीकडचं काहीतरी ऐकत-बघत असल्यासारखा. अखेर म्हणाला, "मी वचन देतो तुला," मग पुढे बोलायच्या आधी अडखळला नि मग बाबाच्या नजरेला सरळ नजर देत हलकेच कुजबुजला, "आय स्वेअर, माय लव्ह."

"जॉन" सोडून इतर कुठल्या नावानं बाबाला हाक मारताना मी शेरलॉकला कधीच पाहिलं नव्हतं. रोखून धरलेला श्वास मी नकळत सोडून दिला. एकमेकांना प्रेमाच्या नावांनी हाका मारत नाहीत ते कधीच. फार फार तर "मॅड बास्टर्ड", "ब्लडी वॅंकर" किंवा "इडियट".

मला जसं आठवलं तसं सांगतेय, असं मी म्हटलं खरं. पण हे सगळं असंच्या असंच घडलं. त्या दिवशीचा शब्द न् शब्द माझ्या डोक्यात पक्का कोरलेला आहे. अजूनही. कधी विसरूच शकत नाही मी. कारण शेरलॉक हे बोलला नि बाबाचा चेहरा बघता बघता विस्कटून गेला. त्यानं शेरलॉकच्या खांद्यावर मान टाकली. तो नक्की रडत असणार. पण मला माहीत नाही, आम्ही बाहेर हॉलमधे गेलो. कारण आईनं मला जवळ घेतलं, नि मला बाहेर घेऊन गेली.

बाहेर माझा हात हातात घेऊन बसलेली असताना आईपण डोळे पुसत होती. मी तिच्याकडे बघत होते ते तिला कळलं असणार. "मलापण हवा आहे तो, जिनी." इतकंच म्हणून ती गप्प झाली. मीपण अजून काही विचारत बसले नाही.

शेवटी बाबा शेरलॉकच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा पार दमलेला दिसत होता. एका 'जादू की झप्पी'नं त्याला बरं वाटलं असतं. म्हणून उठून त्याला मिठी मारली मी. "कशी आहेस?" मला म्हणाला.

"मी? माझं काय, बाबा? तू बरा आहेस का?"

तो हसला, पण चांगलाच थकला होता. "काय माहीत. खूप दमलोय नि जाम वैतागलोय, अजूनही."

आई उठून जवळ आली. "जॉन, चल, थोडी कॉफी घेऊ."

"हम्म. कॉफी हवीय. पण - जिनी?" माझ्याकडे बघत म्हणाला.

"मी थांबते इथे. शेरलॉकशी बोलते."

'काय' असा प्रश्न मला बाबाच्या तोंडावर आलेला दिसत होता. पण आई त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला घेऊन गेलीसुद्धा. कसली मस्त आहे ना माझी आई?

मी परत शेरलॉकच्या खोलीत गेले. तो डोळे मिटून पडला होता, पण झोपलेला नक्की नव्हता. मगाशी बाबा ज्या खुर्चीत बसला होता, तिथे बसून मी त्याचं तोंड माझ्याकडे वळवलं. "कसं वाटतंय आता?"

"ठीक. माझा लॅपटॉप असता तर बरं झालं असतं."

"माझ्या मते तुला आराम करायची गरज आहे."

"हॉस्पिटलमधे कुणी कसा आराम करू शकतं? लोक दर दोन तासांनी येऊन उठवतात नि सांगतात, आराम करा. शक्यच नाहीये आराम करणं."

"त्याला प्रॉमिस केलंस तू, ते ऐकलंय मी. साक्षीदार आहे मी त्या वचनाला."

मान डोलावत म्हणाला, "मला माहीत आहे."

"मग? तू ते पाळलंस तर बरं होईल."

सुस्कारा सोडत म्हणाला, "तुला घाबरवून सोडलं ना मी? आयॅम सॉरी." मनापासून बोलत असावा तो.

"हं. खरंच घाबरले होते मी. तू - तू 'पडला' होतास, शेरलॉक. तोंडावर." नुसत्या आठवणीनंच मला परत घशात काहीतरी टोचल्यासारखं वाटायला लागलं. "कसला विचार करत होतास तू? खरंच काही विचार तरी करत होतास का?"

"अहं. मी केसबद्दल विचार करत होतो."

"लोकांचापण विचार करत जा कधीतरी, ओके? हवं तर तुझ्या मोबाईलमधे मी अलार्म सेट करून देते. केसवर काम करत असताना तो लाव. म्हणजे मग दर तासानी वाजेल तो - तुला एक कुटुंब आहे रे. तू मेला-बिला नाहीस तर त्यांना बरं वाटेल. त्यामुळे काही अगोचरपणा करू नको..."

शेरलॉक हसायला लागला. "याहून वाईट गोष्टी सुचल्या आहेत तुला खरं म्हणजे."

"हो तर. ते ऑरेन्ज-पीनट-बनाना सरप्राईज आठवतंय ना? काय भयानक प्रकार झालेला तो! तो ब्लेण्डर तेव्हा बिघडला तो बिघडलाच."

शेरलॉक हसत सुटला. "आह, युजिनिया. तुझ्याबरोबर असताना कधीच कंटाळा येत नाही मला." ही म्हणजे शेरलॉककडून स्तुतीची परमावधी होती. मग परत तो जरा गंभीर झाला नि माझ्याकडे आर्त नजरेनं बघत राहिला. "मी असा नसतो तर बरं झालं असतं, असं मला तुझ्या बाबामुळे सर्वप्रथम वाटलं. तू दुसरी."

"पण तू आहेस तसा आवडतोस मला. बाबालापण."

"तुम्हांला अजून चांगलं कुणीतरी मिळायला हवं होतं."

"कुणापेक्षा चांगलं?" मला भरून येत होतं आता. "तू सगळ्यांपेक्षा वेगळाच आहेस. तेच बरं आहे!"

"पण मी लोकांना दुखावतो, तेव्हा मला बरं नाही वाटत. विशेषतः ज्यांना कधीच दुखवू नये असं मला वाटत असतं, त्यांना दुखावतो तेव्हा." परत काहीतरी बोलायला धीर गोळा करत असल्यासारखा माझ्याकडे बघत राहिला. "माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर." आता मात्र माझ्या गंगा-जमुना वाहायला लागल्या. "मी असा नसतो, तर मग तुम्हांला त्याबद्दल शंका आली नसती."

"पण मला नाहीच कधी शंका आलेली," नाक पुसत मी म्हटलं. "मला दिसतं तुझ्या डोक्यात काय काय चाललेलं असतं ते." शेरलॉक परत हसला. तो आता तुम्हांला काहीही सांगू दे, त्याचेपण डोळे भरून आले होते. मी त्याचा हात हातात घेत कुजबुजले, "आय लव्ह यू टू."

हुश्श. दमले मी. यानं फार दमायला होतं बाबा.

तर मुद्दा काय आहे - निकोटीन पॅचेसबद्दल कळल्यावर माझं काय झालं असेल ते आता तुम्हांला कळेल. मला नि बाबाला दिलेलं वचन त्यानं इतक्या सहजासहजी मोडून चालण्यातलं नव्हतं. म्हणून त्याला सरळ तोंडावर विचारायचं मी ठरवलंय. इतका वेळ तेच करायला मी धीर गोळा करतेय. आता जाते त्याच्याशी बोलायला. बोलून झालं, की पुढचं लिहिते.

नंतर

हम्म. जसं ठरवलं होतं तसं काही झालं नाही. 

बाबा बाहेर जाईपर्यंत मी थांबले होते. मग मी शेरलॉकला त्यांच्या व्हरांड्यात गाठलं. "तू निकोटीन पॅचेस्‌ लावले होतेस म्हणे. काय होतं ते प्रकरण?" मी त्याला थेट फैलावरच घेतलं. 

तो नुसता बघत राहिला. "हां, तेऽ. लावले होते. गेल्या आठवड्यात."

माझा विश्वासच बसेना. किती बेफिकीरपणे बोलत होता तो. "लावले होते? आम्हाला प्रॉमिस केलं होतंस, त्याचं काय आणि? ते असंच? मोडायला दिलं होतंस? तुला काही बरंवाईट झालं म्हणजे? की ते इतकं काही महत्त्वाचं नाहीये?" आता मी माझेच शब्द आठवून आठवून लिहितेय. पण तेव्हा इतकं मुद्देसूद बोलण्याइतकी मी भानावर नव्हते. नि शिवाय तारस्वरात किंचाळत होते ते निराळंच.

शेरलॉकचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ’देवा-माझीच मुलगी माझ्यावर ओरडतेय-आता मी काय करू’ प्रकारचा चेहरा करून तो माझ्याकडे बघतच राहिला. "जिनी, शांत हो आधी. मी कुठलंही वचन मोडलेलं नाहीये."

"तूच आत्ता म्हणालास, निकोटीन पॅचेस लावले होते म्हणून."

उठून माझ्या हाताला धरून त्यानं मला सोफ्यावर नेऊन बसवलं. मग माझ्या शेजारी बसला. म्हणाला, "ऐक, ऐक जरा." मी थोडी शांत झाले. "तुझ्या बाबानं मला निकोटीन पॅचेसबद्दल सक्त सूचना दिलेल्या आहेत, पण किती पॅचेस लावले तर चालतील, ते नाही सांगितलेलं. एकूण किती डोस चालेल, ते सांगितलंय. चोवीस तासांत जास्तीत जास्त तीस मिलिग्रॅम्स. मी त्याहून जास्त निकोटीन घेतलेलं नाही."

"मग? आई खोटं बोलतेय माझी?"

"नाही. खोटं कसं बोलेल? तिचं निरीक्षण चुकीचं नाहीये, पण निष्कर्ष मात्र चुकीचा आहे. तिनी पाहिलेले तीन पॅचेस अगदी लहान डोसांचे होते. सात-सात मिलिग्रॅम्सचे. म्हणजे तीन पॅचेस लावूनसुद्धा मी माझं लिमिट ओलांडलेलं नव्हतं."

मी त्याच्याकडे रोखून बघितलं. "नक्की? की मला थापा मारतो आहेस?"

"तुला कशा थापा मारीन मी जिनी? तुला माहीत आहे."

"ओह," आता राग ओसरला म्हणताना मला एकदम अधांतरीच वाटायला लागलं. "पण... परवा? परवा तुझ्या हातून काहीतरी गुन्हा घडल्यासारखाच वागत होतास तू! आई म्हणाली, बाबाला सांगीन. नि तू लगेच सारवासारव वगैरे केलीस, ती?"

"कारण तुझ्या बाबानंपण हे असंच तारांगण केलं असतं. तुझ्यासारखंच. आत्ता इतकं काम असताना त्याला कोण तोंड देईल?" सुस्कारा सोडत शेरलॉक म्हणाला, "त्याला नि तुला दिलेलं वचन मी नाही मोडणार कधी. अती झालं की माझं मलापण कळतं. नसेल घेतली मी माझ्या तब्बेतीची धड काळजी पूर्वी, मला मान्य आहे. पण मला असं अवेळी मरून जाण्यातही रस नाहीय."

"हं, ते एक बरं आहे! अवेळी मरणं वाईट!"

शेरलॉकला एकूण अंदाज आला होता. "काय मग? आरडाओरडा करायचं कारण नाही म्हटल्यावर आवाज एकदम खाली आलेला दिसतोय."

"हो. अगदी. हा विषय पुरे आता. दुसरं काहीतरी बोल."

"एक आयडिया आहे. मी तुला ऍन्जेलोच्या रेस्टॉरण्टमधे नेतो जेवायला. येतेस?"

"होऽऽऽऽऽ! वाईन पिऊ देशील?"

"एका अटीवर. बाबाला सांगायचं नाही."

"मी सांगते का त्याला कधीतरी?"

तर - निकोटीन पॅचेस प्रकरण निकालात निघालं. मला वाईन प्यायला मिळाली. शिवाय ऍन्जेलोच्या इथे एक गो‍ऽड नवीन वेटर आलाय. तो येता जाता मला मस्का लावत होता, ते वेगळंच. अर्थात - शेरलॉकनं तत्परतेनं त्याला विचारलंच - त्याच्या गरोदर गर्लफ्रेण्डचं नि त्याच्या आई-बाबांचं सध्या पटतंय का? मग तो परत माझ्या वाटेला गेला नाही.

हुह. बाबा लोकांचं हे असंच.

क्रमशः

***
- भाषांतरासाठी लेखिकेची संमती आहे. तरीही यातल्या सगळ्या बलस्थानांचं श्रेय लेखिकेचं आहे आणि मर्यादांचं वा चुकांचं अपश्रेय माझं आहे, हे इथं नमूद करते.
- हे भाषांतर AO3 (Archive Of Our Own) वर इथे 0 पाहता येईल,  आणि ’ऐसी अक्षरे’वर इथे पाहता येईल.

2 comments:

  1. सॉरी, पण होम्स आणि वॉटसन इतके बदलले तर मग खाली काय राहीलं असा प्रश्न पडतो. हे अर्थातच वैयक्तिक मत आहे पण निदान मला तरी होम्स म्हटलं की जेरेमी ब्रेटच्या होम्सपलिकडे जायची इच्छा होत नाही. अमेरिकन लोकांनी इटालियन पिझ्झा तिकडे नेला आणि त्यात इतके बदल केले की आता अमेरिकन पिझ्झा आणि नापोलीमध्ये मिळणारा मूळ इटालियन पिझ्झा हे दोन वेगवेगळे पदार्थ झाले आहेत. दोन्ही आवडणारे लोक अर्थातच आहेतच. माझ्यापुरतं बोलायचं तर नापोलीचा पिझ्झा खाल्ल्यानंतर इथल्या पिझ्झा हटमध्येही जायची इच्छा होत नाही.
    पुढील भागांसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. मला समजू शकतं. शेरलॉकच्या बाबतीत मी इतपत सहनशील आहे. दुसर्‍या एखाद्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत नसेनही.
    अगदी खरं खरं कबूल करायचं झालं,तर सर्वोत्तम गोष्ट मॉफ्टिसनं (किंवा डॉयलनं म्हणू) आधीच सांगून टाकलेली आहे. काय दाखवायचं नि काय सूचित करून सोडून द्यायचं याबद्दल त्यांनी घेतलेले निर्णय सर्वांत अचूक आहेत. त्यात कोणतेही बदल केले, तरी ते काही प्रमाणात अश्लीलच वाटतील, हे उघड आहे.
    पण मग या कल्पनारंजनाला कुठे जागा द्यायची? या गोष्टी टाकाऊ नाहीत हे तर सरळच आहे. फक्त आपल्या डोक्यातल्या मूळच्या व्यक्तिरेखा थोड्या बाजूला सारता आल्या, नि एकाच वेळी अनेक समांतर जगं अस्तित्वात असू शकतात (जसे होम्सच्या अनेक आवृत्त्या आपण विनातक्रार स्वीकारतो) हे मान्य केलं, की मजा येते. मला आली. माझ्यासाठी त्या व्यक्तिरेखांचं स्वत्व कशाशी निगडीत आहे, हे एकदा स्पष्ट झाल्यावर मी खूप वेगवेगळ्या वातावरणातल्या (टेनिस, अभिनय, अफगाणिस्तानातलं युद्धक्षेत्र... इत्यादी) 'जॉन+शेरलॉक+रहस्य+साहस->नातेसंबंध'कथा एन्जॉय केल्या.
    ती मजा वाटून घ्यावी म्हणून हा खटाटोप. बाकी शुभेच्छांसाठी आभार.

    ReplyDelete