आता आपण कुणाच्या नि कश्याच्याच आकंठ-वेडसर प्रेमात पडणं शक्य नाही असं एका टप्प्यावर लक्षात येतं आणि आपण निबर-शहाणपणाकडे काहीशा कष्टानंच पाऊल टाकणार असतो, त्या टप्प्यावर मला शेरलॉक भेटला. प्रश्न आणि उत्तरांची सरमिसळ होते त्या करड्या प्रदेशाच्या सीमेवरतीच तो थांबलेला. समोरच्या वैराण आकर्षक प्रदेशाची कमालीची ओढ वाटत असते, पण पुढे जायचं धैर्य होत नाही. अशात एकदाच कळून जातं, की मागचे बंध कमालीचे चिवट आहेत आणि या आयुष्यात तरी ते आपल्याकडून तुटता तुटायचे नाहीत. मग ते शहाण्या मुलासारखं स्वीकारून तो तिथेच थांबलेला. चिरंजीव होऊन. तळ्या-मळ्याच्या निर्जन काठावर त्याची सोबत झाली नसती, तरच नवल.

Thursday, May 31, 2012

मला माणसामाणसांनी समृद्ध करत जाणारा तू ...


ओके. मला शेरलॉकचं वेड लागलंय.

कारणं अनेक आहेत आणि ती सगळी इथे स्पष्ट होतीलच असं नाही. पण आपण जे काही करत असतो, त्यातून आपल्यावरचे प्रभाव, त्यामागची पार्श्वभूमी, कारणं आणि परिणामही अप्रत्यक्षरित्या दिसून येत असतात, असं गृहित धरलं, तर ती तशी इथेही दिसून येतीलच.

तर, मला शेरलॉकचं वेड लागलंय.

एखाद्या पात्राच्या प्रेमात पडणं माझ्यासाठी नवं नाही. मग ते वेड ओसरेपर्यंत त्याच्याशी संबंधित मिळू शकेल ती प्रत्येक गोष्ट हस्तगत करणं - अंदाज, तर्क, कल्पनाविस्तार, समीक्षणं, परीक्षणं, मुलाखती, टीका, रसग्रहणं, विवेचनं, सिद्धान्त, स्पष्टीकरणं, समर्थनं, वाद... सगळंच - वाचणं, पाहणं, अनुभवणं, पचवणं, त्याविषयी भरभरून बोलणं... हेही. सगळे जादूचा स्पेल अधिकाधिक लांबवण्यासाठी कळत - नकळत केलेले हट्ट.

तरीही एका टप्प्यावर जादू ओसरते. आपण मोठे होतो, गोष्ट लहान होते, आपले रस्ते निरनिराळे होतात. अनेकानेक कारणं.

तिथवर पोचेपर्यंतचा हा प्रवास. गंमत मुक्कामात नसून प्रवासात असते हे कळणार्‍या, मानणार्‍या, जगणार्‍या प्रत्येकाला...

***
शीर्षक: ’हरिलाल’ या सौमित्रच्या कवितेतून. कवितासंग्रह - ’...आणि तरीही मी’